Sunday, April 19, 2009

गाणे पहावे वाचुन...

मंडळी, काही काही गाणी अशी असतात की ती आपण बरेचवेळा ऎकतो, गातो, गुणगुणतो, पण त्या गाण्यांचा खरा अर्थ काय आहे ते समजवुन घेण्याचा कधी प्रयत्न करत नाही. पण अचानक अशी काहीतरी घटना आपल्या आयुष्यात घडते की आपण एखादे गाणे गुणगुणु लागतो आणि त्यावेळेस चटकन आपल्याला त्या गाण्याचा अर्थ लक्षात येतो. एका मराठी गाण्याबाबत मला हाच अनुभव आला. ती घटना अशी की, २० एप्रिल ११९७ रोजी अचानक माझे वडील वारले. त्यांचे ह्रुदयाचे ऒपरेशन झाल्यानंतर खर तर त्यांची तब्येत सुधारत होती असे वाटत होते. तरीदेखील आपण अमेरिकेतुन जाऊन, काही दिवसंच का होईना, त्यांची सेवा करावी, त्यांच्याबरोबर वेळ घालवावा, क्रिकेटच्या मँचेस टिव्हीवर पाहाव्या अशा विचाराने मी आँफ़ीसला सुट्टी घेतली, पण विमानात बसण्याच्या काही तास आधीच... फ़ोन खणखणला! जो प्रसंग वैरयावर देखील येऊ नये असे वाटते तो प्रसंग जेव्हा आपणा स्वत:वर येतो त्यावेळेस मनावर जो आघात होतो तो कायम स्वरुपाचा असतो. त्यातुन मी कधी सावरेन असे वाटत नाही. आपण कुठेतरी कमी पडलो, चुकलो, सुस्तावलो... ह्या भावनां मनातुन कधीच जाणार नाही. तरीदेखील आल्या प्रसंगाला तोंड देणे भाग होते, म्हणुन गेलो. आपल्या आवडत्या व्यक्तीला, हातात मशाल घेऊन पेटवण्याची क्रुर प्रथा आपल्या हिंदु धर्मात कोणी शोधुन काढली कोणास ठाऊक? आधीच मनावर काय कमी जखमा झालेल्या असतात? आग चितेला लावावी की आपल्या स्वत:ला असे आत्मघातकी विचार त्या पेटवणारयाच्या मनात न आले तरच नवल! तरीही माझ्या मुलीचा चेहेरा डोळ्यापुढे आल्याने मनावर संयम ठेवला आणि न आवडणारया त्या प्रथेचे पालन केले. करावेच लागले. नाहीतर परत ऎकावे लागले असते... "अमेरिकेला जाऊन चार बुक काय वाचली... एकतर सर्व आटोपल्यानंतर आला... " वगैरे वगैरे! धाय मोकळून रडणे म्हणजे काय ते त्यादिवशी कळले मला. घरी येऊन, जगाचा विचार न करता, मनसोक्त रडलो. दुसरया दिवशी जेव्हा मन जरा मोकळे झाले त्या दिवशी अचानक हे गाणे ऒठावर आले. कसे कोणास ठाऊक? त्यावेळेस मात्र ह्या गाण्याचा खरा अर्थ लक्षात आला.

खरे तर ह्या गाण्यात माझ्या आईच्या मनातील विचार कविने मांडले आहेत. असे म्हणतात की, पती-पत्नीची अनेक वर्षांची जोडी जेव्हा तुटते तेव्हा जी व्यक्ती ह्या जगातुन निघुन जाते ती सर्व वेदनांतुन मुक्त होते, सुखी होते, पण जी व्यक्ती रहाते ती मात्र दुखा:च्या दरीत कोसळते. त्याच व्यक्तीच्या मनातील विचार कविने ह्या गाण्यात अगदी अचुकपणे टिपले आहेत.

मंडळी माझी आपणाला एकच विनंती आहे की आज हे गाणे आपण मनातल्या मनात फ़क्त वाचावे. गुणगुणलात तरी हरकत नाही पण प्रत्येक ऒळीचा अर्थ लक्षात घ्यावा. गाणं आपणा सर्वांच्या परिचयाचे आहे... आवडीचे आहे... त्याचे शिर्षक आहे....

वेगवेगळी फ़ुले ऊमलली

वेगवेगळी फुले ऊमलली, रचुनी त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले, गेले ते दिन गेले

कदंब तरुला बांधुनी झोळा, ऊंच खालती झोले
परस्परांनी दिले घेतले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले

हरीत बिलोरी वेलबुटीवरी शीतरसांचे प्याले
अन्योन्यांनी किती झोकले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले

निर्मल भावे नव देखावे, भरुनी दोन्ही डोळे
तु मी मिळूनी रोज पाहिले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले...


मंडळी, हे गाणे कोणाचे? हा प्रश्न विचारला तर लोक मला वेड्यातच काढतील. अर्थातच हे गाणे आहे... ह्रदयनाथांचे! पण ह्या गाण्याचा, कवी म्हणा किंवा गीतकार म्हणा, कोण हे विचारले तर तुम्हाला ऊत्तर देता येईल का हो? नाही ना? My point exactly... साहित्यीकांना कोण विचारतो आजकाल? असो!

"जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी आपल्या मराठी संस्क्रुतिची सेवा करत राहा" हा सल्ला देणारया आणी वेळप्रसंगी माझी कानऊघडणी करणारया माझ्या लाडक्या बाबांच्या १२ व्या पुण्यतिथीच्या निमीत्तांने त्यांना वाहिलेली ही भावपुर्ण श्रध्दांजली!

1 comment:

  1. I started reading your blog since Vijay told me about it. This article is very good and so are others.
    Keep up good work.
    Manisha

    ReplyDelete