Thursday, April 2, 2009

आलो होतो अमेरिकेला....

ह्या आठवड्यात आँफ़िस मध्ये बरेच काम होते. त्यामुळे शब्दगंधेच्या बाहुत जाण्याच्या संध्या फ़ारश्या मिळाल्या नाहीत. म्हणजे, जेव्हा गेलो तेव्हा तिच्याशी फ़क्त आँफ़ीसच्या कामाबद्दलच बोललो. म्हणुन म्हटले ह्या वेळेस ब्लाँगवर काहीतरी जुनेच मटेरीयल टाकावे.

जवळ जवळ अठरा वर्षांपुर्वी लिहीलेली कविता आठवली. नुकतेच ग्रीनकार्ड मिळाल्यानंतरचे ते दिवस. मन कसे द्विधा झाले होते तेव्हा. एकीकडे ग्रीनकार्ड मिळवण्याची कामगिरी बजावल्याचा आनंद, तर दुसरीकडे आपल्या जन्मभुमीला परतणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याची जाणीव! अशा विचित्र मनस्थीतीत मी ही कविता लिहीली. ती सर्वप्रथम शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या ’रचना’ मासिकात प्रसिध्द झाली. त्यानंतर श्रीमती ’वाघ’ ह्यांनी ती कँनडातुन प्रसिध्द होणारया ’एकता’ ह्या मासिकाकडे पाठवून त्यावर एक छान लेखही लिहीला, त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक आभार! (टीकाकार: चित्रे फ़ारच बोलता बुवा तुम्ही स्वत: बद्दल!)

मी ही कविता लिहील्यानंतर काही दिवसांनीच आपले आजचे पंतप्रधान व त्यावेळचे अर्थमंत्री श्री. मनमोहन सिंगजीनी भारताच्या अर्थव्यवस्थेत असे काही अमुलाग्र बदल घडवुन आणले की त्यानंतर आपल्या भारताची ऊत्तरोत्तर प्रगतीच होत गेली. जी आजतागायत चालूच आहे. आजकालची भारतातुन अमेरिकेत येणारी तरुण पिढीतील मंडळी, आंम्ही अडकलो तसे अडकून न रहाता, स्वखुषीने भारतात परततात त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटते. एकंदरीत माझी कविता मनमोहनजी इतकी मनावर घेतील असे वाटले नव्हते :) (टीकाकार: देवा, कठीण आहे रे बाबा ह्या माणसाचे!) असो.

वाचकांमध्ये कोणी माझ्यासारखे द्विधा मनस्थीतीत असतील (टीकाकार: अहो चित्रे, आधी कोणी ’वाचक’ असतील की नाही कोणास ठाऊक!) तर कदाचीत त्यांना ही कविता आवडेल असे वाटले म्हणून... पेशे खीदमत है... अजयमींया कहेते है...

आलो होतो अमेरिकेला...
(कवी: अजय चित्रे
दिनांक: गुढीपाडवा, १९९१)


आलो होतो अमेरिकेला
ऊच्च शिक्षण घेण्यासाठी
थोडा पैसा थोडा अनुभव
कमवुनी परत जाण्यासाठी

आता संसार थाटुनी बसलो
निघता पाय निघत नाही
मायभुमीला परतण्याची
ओढ कमीही होत नाही

मनात फ़िरुनी विचार येई
येऊन इकडे काय मिळवले?
हरवलेले गवसताना
गवसलेले काय हरवले?

इकडे पैसा भरपुर आहे
पण आपुलकी आहे का हो?
तिकडे आपुलकी जरी असली
तरी सच्चाई आहे का हो?

इकडे सच्चाई जरी असली
तरी संस्क्रुति आहे का हो?
तिकडे संस्क्रुति जरी असली
तरी स्वातंत्र्य आहे का हो?

इकडे आहे तिकडे नाही
तिकडे आहे इकडे नाही
सुखदुखांच्या जमाखर्चाचा
हिशोब कधीच लागत नाही
हिशोब कधीच लागणार नाही
निघता पाय निघणार नाही
निघता पाय निघणार नाही....

2 comments:

  1. "निघता पाय निघणार नाही" म्हणुन एकदम निकालच देऊन टाकला तुम्ही चित्रे!

    ReplyDelete
  2. Kavita awadli.
    Asech lihit raha.

    ReplyDelete