Sunday, March 15, 2009

निंदकाचे घर असावे.... मनात!

’निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हटले जाते. पण माझ्या सुदैवाने माझी सर्वात जास्त निंदा करणारा टीकाकार हा माझ्या मनातच वसलेला आहे. त्यामुळे कुठ्लीही गोष्ट करण्या अगोदर मी माझ्या मनातल्या ह्या टीकाकार बरोबर भरपुर चर्चा करतो. त्याने परवानगी दिली नाही तर मी कुठलीच गोष्ट करत नाही. ह्याचे दोन फ़ायदे होतात. एकतर आपोआप आत्मपरिक्षण होते, आणि दुसर म्हणजे शेजार-पाजारच्या निंदकांना तोंड देण्यासाठी पुर्वतयारी होते. मी जेव्हा ह्या ब्लोग वरील पहिला लेख लिहीला ना, तो सर्वप्रथम माझ्या मनातील ह्या टीकाकाराला वाचायला दिला. तो लेख त्याने वाचल्यानंतर झालेली आमची चर्चा पुढीलप्रमणे...

टीकाकार: खरं सांगु चित्रे... तुमचा लेख वाचून ना अगदी झोप आली!

मी: ठीक आहे हो... झोप येई पर्यन्त वाचलात ना त्याबद्दल आभार! कसा वाट्ला?

टीकाकार: काय वाट्टेल ते लिहीता हो तुम्ही.

मी: हो ना. केवळ तुमची ’वाट्टेल ते’ वाचण्याची भुक भागावी म्हणून!

टीकाकार: पण काय हो... इतका वेळ कसा मिळतो हो तुम्हाला? काय जाँब वगैरे गेला की काय?

मी: नाही हो. आहे अजुन जाँब. पण गेला ना की नक्की कळवीन हं तुम्हाला!

टीकाकार: मग आजकाल आँफ़ीसला खुप दांड्या मारता वाटत!

मी: नाही हो. अगदी दररोज जातो कामावर. अर्थात दररोज काम करतोच असे नाही... पण न चुकता जातो आणि चुकत माकत का होईना पण थोड्फ़ार काम करतो.

टीकाकार: तरी एव्हढा मोकळा वेळ मिळतो? हं... बायको सोडुन गेली वाटत...

मी: नाही!!!. नाही गेली सोडून अजुनतरी. हो, आणी तुम्ही विचारण्याआधीच सांगतो... मी तिला सोड्ण्याचा प्रश्नच येत नाही... कारण तुम्हाला आपण इंटरनेटवर वाचलेला तो मराठी शेर आठवत असेल ना....
कविश्रेष्ठ स. दा. चहाटाळ यांचा...

तुझ्याशिवाय माझ्या मनात ।
कोणा मुलीचा विचार असणार नाही ॥
कारण तुझ्या व्यतिरीक्त असे मला ।
फ़ुकटचे कोणी पोसणार नाही ॥

(म्हणजे मी काही अगदीच फ़ुकट्या नाही हं! अगदी ’खोरयाने’ नसलो तरी थोडेफ़ार पैसे मी देखिल ऒढतो हो!)

टीकाकार: कमाल आहे! मग कसा काय एव्हढा मोकळा वेळ मिळतो?

मी: त्याच काय आहे, अहो आजकाल अर्थहीन हिंदी सिनेमे, टिव्ही सिरीयल आणि ’अन’रियालीटी शो-स पहाणे पुर्णपणे बंद केलय मी. त्यामुळे विकएंडला तीन चार तास तरी वाचतात. तो वेळ मी माझी बायको आणि माझ्या दोन मुली ह्यांच्याबरोबर घालवतो. मग ते दमून झोपायला गेले की आपल्या संत रामदासांची आठवण येते. ते म्हणुन गेले होते ना की... दिसामाजी काही तरी ते लिहावे.... (पण म्हणून अगदी काहितरीच लिहु नये)... ह्या विचाराने लिहीण्यासाठी लेखणी हातात घेतो आणि मग ’महानोर’ करत असत तशी विनवणी करत म्हणतो... "शब्दगंधे, तु मला बाहुत घ्यावे"!

टीकाकार: बापरे आता ही शब्दगंधा कोण? आणि बायको झोपल्यावर ’तिच्या’ बाहूत जाता... मज्जा आहे बुवा ऎका मुलाची ;) मिड लाईफ़ क्रायसीस म्हणायचा की! पण जरा जपुन बरं का चित्रे...

मी: अहो काय वाट्टेल ते काय बोलता? जी शब्द सुचवते ती शब्दगंधा देवी! आता लिहायला घेतल्यावर जर तिने शब्दच सुचवले नाहीत तर मग काय लिहीणार कपाळ? म्हणून तिला विनवतो इतकेच!

टीकाकार: पण काय हो, संमेलन संपल्यानंतर तुमचे मनोगत सांगताय, म्हणजे हे वराती मागून घोडं येण्यासारखचं झाल, नाही का?

मी: अहो कमाल करताय. संमेलनाची तुलना वरातीशी काय करता? संमेलन म्हणजे काही तीन दिवसाचा लगीनसोहळा नव्हे, की एकदा वरहाडी मंडळी निघुन गेली की संपली जबाबदारी! अहो, विश्व संमेलन ही एक प्रथा आहे. जगभर पसरलेल्या मराठी साहित्यीकांचा गौरव करण्याची! ती टिकायला हवी. त्या द्रुष्टीकोनातुन मनात दडलेले विचार लिहीले इतकच! कोणी सांगाव, कदाचित माझ्या ह्या विचारांचा भावी संयोजकांना ऊपयोग होईल!

टीकाकार: पण तुमचे हे "सो काँल्ड" विचार म्हणजे तुमच्या विरोधकांना उत्तर देण्याचा एक ’केविलवाणा’ प्रयत्न वाटतो हो. असे करु नये, चित्रे. अहो लोकांच्या भावना दुखावतात अशांने.

मी: खरचं? तसं वाटल तुम्हाला? पण तसा अजिबात हेतु नाही माझा. अहो एव्हढा लांबलचक लेख लिहीण्यामागचा उद्देश हाच की सर्वांना हे सांगावे की, संमेलनात भाग घेण्यामागे काही ठोस विचार होते. ऊगाच घ्यायचा म्हणून मी भाग घेतला नाही. केवळ नडायचे म्हणून नडलो नाही. घरातील कामे, आँफ़ीसची कामे, मुलींचे अभ्यास ही सर्व तारेवरची कसरत सांभाळताना अहो नाके ’अठरा’ येतात - नऊ कसले? पण तरीदेखिल संमेलनाच्या भानगडीत ’पडलो’ ते मराठी साहित्यीकांचा गौरव करण्यासाठी, ह्याचा विचार विरोधक करतील आणि पुढील संमेलनात सहभागी होतील अशी आशा वाटते.

आता भावनांचे म्हणालं तर शेवटी मराठी माणसांच्या भावना त्या! त्यांना दुखायला फ़ारशी कारणं आणि वेळ लागत नाही हो. पण मी जेव्हा लिहीतो ना तेव्हा कोणाच्याही भावना दुखवण्याचा कधीच हेतु नसतो माझा. तरी देखील कोणाच्या भावना दुखावल्याच तर आधीच माफ़ी मागतो.

माझे लेखन म्हणजे स्वत:च्या करमणुकीकरता केलेली खरडपट्टी आहे ह्याची नोंद वाचक घेतील अशी अपेक्षा आहे. वाचकांना माझी मते आवडली तर आनंद आहे, पण नाही आवडली तर बिनधास्त मला कळवून ते माझी कानऊघडनी करतील अशी अपेक्षा आहे. शिवाय माझी कानऊघडणी करणे सोपे जावे ह्याकरता माझ्या ब्लाँगच्या सेटिंगस मी बदललेल्या आहेत. ह्या पुढे comments लिहायला Id किंवा Profile ची गरज नाही. कोणीही यावे आणि Anonymous राहून मला मनसोक्त शिव्या द्याव्यात!

टीकाकार: पण काय हो, आपल्याच घरचं कार्य आपण स्वत:च "यशस्वी झाले" असे घोषीत करणे हे बरे दिसते का?

मी: नाही हो, पण हे मत माझे नाही. हे मत आमच्या पाहुण्यांचे आहे. वाचा ह्या दुव्यावर...
http://onlinenews.lokmat.com/php/detailedmanthan.php?id=Manthan-52-1-21-02-2009-d5f58&ndate=2009-02-22

टीकाकार: पण नाही म्हणायला थोड्याफ़ार तरी चुका झाल्या असतीलच ना? मग त्याबद्दल लिहा की. त्याचा खरा ऊपयोग होईल पुढच्या संमेलनाला!

मी: लिहीन की. चुका तुम्ही माझ्या नजरेत आणून द्या, मग लिहीतो.

टीकाकार: पण मला सांगा, ह्या संमेलनाने नक्की काय साधले हो?

मी: बरेच काही. पण ह्या प्रश्नाचे ऊत्तर द्यायचे तर एक वेगळाच लेख लिहावा लागेल. लिहू पुढे केव्हांतरी. मग काय म्हणता? टाकू का माझा लेख माझ्या ब्लोगवर?

टीकाकार: तशा शुध्दलेखनाच्या बरयाच चुका आहेत, तरी टाका... पण हे बघा.. डोन्ट क्वीट युवर डे टाईम जाँब हं... म्हणजे... अंटील युवर जाँब क्वीट्स यु ;)

1 comment:

  1. Ajay,

    I enjoyed your dialog with yourself, you are good at it; I mean writing. I wish I can type in Marathi so that I can express myself better. I do intend to download the font and post my comments in Marathi but until then English would suffice.

    - Shilpa

    ReplyDelete