Saturday, May 9, 2009

फ़ाँन्टस बद्दल थोडे फ़ार... खरं तर... फ़ारच थोडे!

मी हा ब्लोग लिहायला सुरवात केल्यानंतर काही जणांनी मला फ़ाँन्टसबद्दल जे प्रश्न विचारले त्यावरुन असे वाटले की मी ह्या विषयावर मला जी माहिती आहे ती लिहून काठावी. ह्या मागे कोणाला काहितरी "शिकवणे" हा मुळ उद्देश नसुन, शिकवण्याचा प्रयत्न करता करता आपणच काहितरी शिकणे हा खरा उद्देश आहे.

मराठीत टायपिंग करायचे म्हटले की पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे... फ़ाँन्ट कुठला वापरायचा? आजकाल हजारो फ़ाँन्टस आहेत! पण माझ्या मित्रमंडळींच्या प्रामुख्याने खालील तक्रारी असतात...

१) ऎका फ़ाँन्टमधे लिहिले की ते दुसरया मध्ये बदलणे सोपे नसते / अशक्य असते.
२) ईंग्लीश कि-बोर्ड वापरुन मराठी टाईप करणे फ़ार अवघड जाते.
३) ऎका फ़ाँन्ट मध्ये लिहीलेले दुसरयाला वाचायला दिले तर त्याला तोच फ़ाँन्ट वापरायला (install करायला) लागतो.
४) जोडाक्षरे स्क्रीनवर नीट दिसत नाहीत.

ह्या तक्रारी काही वर्षांपुर्वी रास्त होत्या, पण आता ह्या क्षेत्रात ईतकी प्रगती झाली आहे की ह्या अडचणींवर मात करणे अगदी सोपे आहे. ती कशी करायची हे समजुन घेण्यासाठी काही techincal terms समजुन घेणे आवश्यक आहे. त्या पुढीलप्रमाणे...

Unicode: It is a character set that provides a unique number for every character. पुर्वीच्या काळात कम्पुटर्सना फ़क्त ईंग्लीश भाषेतीलच अक्षरे कळत असत. इतर भाषांतील अक्षरे देखिल कळावीत ह्या करता Unicode चा जन्म झाला. मराठी भाषेतील प्रत्येक अक्षर, अनुस्वारा करिता एक वेगळा नंबर (bytecode) देण्यात आलेला आहे. त्यामुळेच आपण कुठलाही फ़ाँन्ट वापरुन लिहीले तरी कम्पुटर ते अक्षर ठराविक नंबर मध्येच जतन करते.

तुम्ही म्हणाल...कुठलाही फ़ाँन्ट? कुठलाही म्हणजे अगदी कुठलाही नाही हो, पण तुम्ही निवडलेला फ़ाँन्ट हा "Open Type" ह्या गटातला असावा, कारण ह्या गटातील फ़ाँन्ट Unicode मध्ये मजकुर जतन करतात. आजकालचे नविन सर्वच फ़ाँन्ट ह्या गटातील असल्याने नविन फ़ाँन्ट निवडताना तसा फ़ारसा प्रश्न येत नाही. मी स्वत: BarahaIME (http://www.baraha.com/index.htm) नावाचा फ़ाँन्ट वापरतो. हा मराठी साठी चांगला आहे. तश्या थोड्याफ़ार त्रुट्या आहेत त्यात, नाही असे नाही, पण त्या लवकरच दुरुस्त होतील अशी आशा वाटते.

खर तरं प्रश्न पडतो त्यांना, ज्यांना जुने फ़ाँन्ट वापरण्याची सवय आहे. बरेचसे जुने फ़ाँन्टस Unicode वापरत नाहीत. त्यामुळे जुने फ़ाँन्टस वापरु नका! अर्थात हे सांगणे सोपे आहे पण नविन फ़ाँन्ट म्हटल की परत टायपिंग शिकणे आले. ते वाटते तितके अवघड नाही, पण त्याकरता ऎका नविन technical term ची ऒळख करुन घेणे जरुरीचे आहे - ती म्हणजे... Transliteration. त्याची माहिती खाली दिलेली आहे.

Unicode वापरण्याचे अनेक फ़ायदे आहेत, पण त्यातील महत्वाचे फ़ायदे म्हणजे, Unicode वापरुन ईंटरनेटवर जतन केलेली माहिती ही गुगल सारख्या search engines ना अगदी सहज शोधता येते. दुसरा फ़ायदा असा की ऎका फ़ाँन्ट मध्ये लिहीलेले दुसरया मधे सहज बदलता येते.

एकंदरीत Unicode मुळे तक्रार क्रमांक १ चा प्रश्न सुटतो.

Transliteration: It is a method of writing script of one language using the characters of another language. (http://en.wikipedia.org/wiki/Transliteration)

अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर, जर ’ajay chitre' असे ईंग्लीश भाषेत टाईप केले तर स्क्रीनवर चक्क ’अजय चित्रे’ दिसते ते transliteration मुळे. अर्थातच हे अगदी सोपे उदाहरण झाले. प्रत्येक शब्द काही तितका सोपा नसतो, पण टायपिंग शिकणे हे पोहायला किंवा सायकल चालवायला शिकण्यासारखेच आहे, नाही का? सुरवातीला माणुस गटांगळ्या घालतो, पडतो. पण एकदा का muscle memory मध्ये नोंद झाली, की बस, मग सायकल चालवायला काय मजा येते राव!

आणखी काही उदाहरणं द्यायची झाली तर... समजा तुंम्ही...

mI shivaajIraaje bhosale bolatoya हे टाईप केलेत तर स्क्रीनवर ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हे दिसेल. किती सोपे आहे नाही का? आता ह्यापेक्षा काम सोपे करायचे असेल तर तुम्ही मलाच पैसे द्या, मी करेन तुमच्याकरता टायपिंग -:)

Transliteration मुळे तक्रार क्रमांक २ चा प्रश्न सुटतो.


Glyph: Actual visual representation of a character. आता उरल्या तक्रार क्रमांक ३ आणि ४. जर का फ़ाँन्ट तयार करणारयाने प्रत्येक अक्षराचे glyph चांगले बनवले असेल तर ह्या ही तक्रारींना जागा रहात नाही. तरी देखील जर का जोडाक्षरे नीट दिसत नसतील तर तो दोष फ़ाँन्टचा नाही. आपण ईंटरनेटवर वाचत असाल तर ’ब्राऊझर सेटींगस’ बदलाव्या लागतील.

जर एखाद्याने तुम्हाला मराठीत unicode वापरुन लिहीलेले document पाठवले, तर त्याचाच फ़ाँन्ट install करण्याची गरज नाही. ’विंडोज’ आपोआप ’मंगल’ ह्या फ़ाँन्ट मध्ये रुपांतर करते. ह्या साठी काही सेटींगस ’विंडोस’ मध्ये करण्याची गरज आहे.

ह्याबद्दल अधिक माहिती ह्या दुव्यावर मिळेल... http://marathiblogs.net/font_problem


सारांश: ’गुगल’, ’मायक्रोसोफ़्ट’ ह्या सारख्या कंपन्या वेगवेगळ्या भाषिकांना त्यांच्या भाषेत कंम्पुटर्सवर लिहीता/वाचता यावे ह्याकरता कोट्यावधी रुपये खर्च करत असताना जर आपणच मराठी भाषेत टाईप करण्याचा त्रास घेतला नाही तर आपली मराठी संस्क्रुती टिकणार कशी? नाही का? असो... सुज्ञास सांगणे न लगे!

Sunday, April 19, 2009

गाणे पहावे वाचुन...

मंडळी, काही काही गाणी अशी असतात की ती आपण बरेचवेळा ऎकतो, गातो, गुणगुणतो, पण त्या गाण्यांचा खरा अर्थ काय आहे ते समजवुन घेण्याचा कधी प्रयत्न करत नाही. पण अचानक अशी काहीतरी घटना आपल्या आयुष्यात घडते की आपण एखादे गाणे गुणगुणु लागतो आणि त्यावेळेस चटकन आपल्याला त्या गाण्याचा अर्थ लक्षात येतो. एका मराठी गाण्याबाबत मला हाच अनुभव आला. ती घटना अशी की, २० एप्रिल ११९७ रोजी अचानक माझे वडील वारले. त्यांचे ह्रुदयाचे ऒपरेशन झाल्यानंतर खर तर त्यांची तब्येत सुधारत होती असे वाटत होते. तरीदेखील आपण अमेरिकेतुन जाऊन, काही दिवसंच का होईना, त्यांची सेवा करावी, त्यांच्याबरोबर वेळ घालवावा, क्रिकेटच्या मँचेस टिव्हीवर पाहाव्या अशा विचाराने मी आँफ़ीसला सुट्टी घेतली, पण विमानात बसण्याच्या काही तास आधीच... फ़ोन खणखणला! जो प्रसंग वैरयावर देखील येऊ नये असे वाटते तो प्रसंग जेव्हा आपणा स्वत:वर येतो त्यावेळेस मनावर जो आघात होतो तो कायम स्वरुपाचा असतो. त्यातुन मी कधी सावरेन असे वाटत नाही. आपण कुठेतरी कमी पडलो, चुकलो, सुस्तावलो... ह्या भावनां मनातुन कधीच जाणार नाही. तरीदेखील आल्या प्रसंगाला तोंड देणे भाग होते, म्हणुन गेलो. आपल्या आवडत्या व्यक्तीला, हातात मशाल घेऊन पेटवण्याची क्रुर प्रथा आपल्या हिंदु धर्मात कोणी शोधुन काढली कोणास ठाऊक? आधीच मनावर काय कमी जखमा झालेल्या असतात? आग चितेला लावावी की आपल्या स्वत:ला असे आत्मघातकी विचार त्या पेटवणारयाच्या मनात न आले तरच नवल! तरीही माझ्या मुलीचा चेहेरा डोळ्यापुढे आल्याने मनावर संयम ठेवला आणि न आवडणारया त्या प्रथेचे पालन केले. करावेच लागले. नाहीतर परत ऎकावे लागले असते... "अमेरिकेला जाऊन चार बुक काय वाचली... एकतर सर्व आटोपल्यानंतर आला... " वगैरे वगैरे! धाय मोकळून रडणे म्हणजे काय ते त्यादिवशी कळले मला. घरी येऊन, जगाचा विचार न करता, मनसोक्त रडलो. दुसरया दिवशी जेव्हा मन जरा मोकळे झाले त्या दिवशी अचानक हे गाणे ऒठावर आले. कसे कोणास ठाऊक? त्यावेळेस मात्र ह्या गाण्याचा खरा अर्थ लक्षात आला.

खरे तर ह्या गाण्यात माझ्या आईच्या मनातील विचार कविने मांडले आहेत. असे म्हणतात की, पती-पत्नीची अनेक वर्षांची जोडी जेव्हा तुटते तेव्हा जी व्यक्ती ह्या जगातुन निघुन जाते ती सर्व वेदनांतुन मुक्त होते, सुखी होते, पण जी व्यक्ती रहाते ती मात्र दुखा:च्या दरीत कोसळते. त्याच व्यक्तीच्या मनातील विचार कविने ह्या गाण्यात अगदी अचुकपणे टिपले आहेत.

मंडळी माझी आपणाला एकच विनंती आहे की आज हे गाणे आपण मनातल्या मनात फ़क्त वाचावे. गुणगुणलात तरी हरकत नाही पण प्रत्येक ऒळीचा अर्थ लक्षात घ्यावा. गाणं आपणा सर्वांच्या परिचयाचे आहे... आवडीचे आहे... त्याचे शिर्षक आहे....

वेगवेगळी फ़ुले ऊमलली

वेगवेगळी फुले ऊमलली, रचुनी त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले, गेले ते दिन गेले

कदंब तरुला बांधुनी झोळा, ऊंच खालती झोले
परस्परांनी दिले घेतले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले

हरीत बिलोरी वेलबुटीवरी शीतरसांचे प्याले
अन्योन्यांनी किती झोकले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले

निर्मल भावे नव देखावे, भरुनी दोन्ही डोळे
तु मी मिळूनी रोज पाहिले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले...


मंडळी, हे गाणे कोणाचे? हा प्रश्न विचारला तर लोक मला वेड्यातच काढतील. अर्थातच हे गाणे आहे... ह्रदयनाथांचे! पण ह्या गाण्याचा, कवी म्हणा किंवा गीतकार म्हणा, कोण हे विचारले तर तुम्हाला ऊत्तर देता येईल का हो? नाही ना? My point exactly... साहित्यीकांना कोण विचारतो आजकाल? असो!

"जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी आपल्या मराठी संस्क्रुतिची सेवा करत राहा" हा सल्ला देणारया आणी वेळप्रसंगी माझी कानऊघडणी करणारया माझ्या लाडक्या बाबांच्या १२ व्या पुण्यतिथीच्या निमीत्तांने त्यांना वाहिलेली ही भावपुर्ण श्रध्दांजली!

Thursday, April 2, 2009

आलो होतो अमेरिकेला....

ह्या आठवड्यात आँफ़िस मध्ये बरेच काम होते. त्यामुळे शब्दगंधेच्या बाहुत जाण्याच्या संध्या फ़ारश्या मिळाल्या नाहीत. म्हणजे, जेव्हा गेलो तेव्हा तिच्याशी फ़क्त आँफ़ीसच्या कामाबद्दलच बोललो. म्हणुन म्हटले ह्या वेळेस ब्लाँगवर काहीतरी जुनेच मटेरीयल टाकावे.

जवळ जवळ अठरा वर्षांपुर्वी लिहीलेली कविता आठवली. नुकतेच ग्रीनकार्ड मिळाल्यानंतरचे ते दिवस. मन कसे द्विधा झाले होते तेव्हा. एकीकडे ग्रीनकार्ड मिळवण्याची कामगिरी बजावल्याचा आनंद, तर दुसरीकडे आपल्या जन्मभुमीला परतणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याची जाणीव! अशा विचित्र मनस्थीतीत मी ही कविता लिहीली. ती सर्वप्रथम शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या ’रचना’ मासिकात प्रसिध्द झाली. त्यानंतर श्रीमती ’वाघ’ ह्यांनी ती कँनडातुन प्रसिध्द होणारया ’एकता’ ह्या मासिकाकडे पाठवून त्यावर एक छान लेखही लिहीला, त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक आभार! (टीकाकार: चित्रे फ़ारच बोलता बुवा तुम्ही स्वत: बद्दल!)

मी ही कविता लिहील्यानंतर काही दिवसांनीच आपले आजचे पंतप्रधान व त्यावेळचे अर्थमंत्री श्री. मनमोहन सिंगजीनी भारताच्या अर्थव्यवस्थेत असे काही अमुलाग्र बदल घडवुन आणले की त्यानंतर आपल्या भारताची ऊत्तरोत्तर प्रगतीच होत गेली. जी आजतागायत चालूच आहे. आजकालची भारतातुन अमेरिकेत येणारी तरुण पिढीतील मंडळी, आंम्ही अडकलो तसे अडकून न रहाता, स्वखुषीने भारतात परततात त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटते. एकंदरीत माझी कविता मनमोहनजी इतकी मनावर घेतील असे वाटले नव्हते :) (टीकाकार: देवा, कठीण आहे रे बाबा ह्या माणसाचे!) असो.

वाचकांमध्ये कोणी माझ्यासारखे द्विधा मनस्थीतीत असतील (टीकाकार: अहो चित्रे, आधी कोणी ’वाचक’ असतील की नाही कोणास ठाऊक!) तर कदाचीत त्यांना ही कविता आवडेल असे वाटले म्हणून... पेशे खीदमत है... अजयमींया कहेते है...

आलो होतो अमेरिकेला...
(कवी: अजय चित्रे
दिनांक: गुढीपाडवा, १९९१)


आलो होतो अमेरिकेला
ऊच्च शिक्षण घेण्यासाठी
थोडा पैसा थोडा अनुभव
कमवुनी परत जाण्यासाठी

आता संसार थाटुनी बसलो
निघता पाय निघत नाही
मायभुमीला परतण्याची
ओढ कमीही होत नाही

मनात फ़िरुनी विचार येई
येऊन इकडे काय मिळवले?
हरवलेले गवसताना
गवसलेले काय हरवले?

इकडे पैसा भरपुर आहे
पण आपुलकी आहे का हो?
तिकडे आपुलकी जरी असली
तरी सच्चाई आहे का हो?

इकडे सच्चाई जरी असली
तरी संस्क्रुति आहे का हो?
तिकडे संस्क्रुति जरी असली
तरी स्वातंत्र्य आहे का हो?

इकडे आहे तिकडे नाही
तिकडे आहे इकडे नाही
सुखदुखांच्या जमाखर्चाचा
हिशोब कधीच लागत नाही
हिशोब कधीच लागणार नाही
निघता पाय निघणार नाही
निघता पाय निघणार नाही....

Sunday, March 15, 2009

निंदकाचे घर असावे.... मनात!

’निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हटले जाते. पण माझ्या सुदैवाने माझी सर्वात जास्त निंदा करणारा टीकाकार हा माझ्या मनातच वसलेला आहे. त्यामुळे कुठ्लीही गोष्ट करण्या अगोदर मी माझ्या मनातल्या ह्या टीकाकार बरोबर भरपुर चर्चा करतो. त्याने परवानगी दिली नाही तर मी कुठलीच गोष्ट करत नाही. ह्याचे दोन फ़ायदे होतात. एकतर आपोआप आत्मपरिक्षण होते, आणि दुसर म्हणजे शेजार-पाजारच्या निंदकांना तोंड देण्यासाठी पुर्वतयारी होते. मी जेव्हा ह्या ब्लोग वरील पहिला लेख लिहीला ना, तो सर्वप्रथम माझ्या मनातील ह्या टीकाकाराला वाचायला दिला. तो लेख त्याने वाचल्यानंतर झालेली आमची चर्चा पुढीलप्रमणे...

टीकाकार: खरं सांगु चित्रे... तुमचा लेख वाचून ना अगदी झोप आली!

मी: ठीक आहे हो... झोप येई पर्यन्त वाचलात ना त्याबद्दल आभार! कसा वाट्ला?

टीकाकार: काय वाट्टेल ते लिहीता हो तुम्ही.

मी: हो ना. केवळ तुमची ’वाट्टेल ते’ वाचण्याची भुक भागावी म्हणून!

टीकाकार: पण काय हो... इतका वेळ कसा मिळतो हो तुम्हाला? काय जाँब वगैरे गेला की काय?

मी: नाही हो. आहे अजुन जाँब. पण गेला ना की नक्की कळवीन हं तुम्हाला!

टीकाकार: मग आजकाल आँफ़ीसला खुप दांड्या मारता वाटत!

मी: नाही हो. अगदी दररोज जातो कामावर. अर्थात दररोज काम करतोच असे नाही... पण न चुकता जातो आणि चुकत माकत का होईना पण थोड्फ़ार काम करतो.

टीकाकार: तरी एव्हढा मोकळा वेळ मिळतो? हं... बायको सोडुन गेली वाटत...

मी: नाही!!!. नाही गेली सोडून अजुनतरी. हो, आणी तुम्ही विचारण्याआधीच सांगतो... मी तिला सोड्ण्याचा प्रश्नच येत नाही... कारण तुम्हाला आपण इंटरनेटवर वाचलेला तो मराठी शेर आठवत असेल ना....
कविश्रेष्ठ स. दा. चहाटाळ यांचा...

तुझ्याशिवाय माझ्या मनात ।
कोणा मुलीचा विचार असणार नाही ॥
कारण तुझ्या व्यतिरीक्त असे मला ।
फ़ुकटचे कोणी पोसणार नाही ॥

(म्हणजे मी काही अगदीच फ़ुकट्या नाही हं! अगदी ’खोरयाने’ नसलो तरी थोडेफ़ार पैसे मी देखिल ऒढतो हो!)

टीकाकार: कमाल आहे! मग कसा काय एव्हढा मोकळा वेळ मिळतो?

मी: त्याच काय आहे, अहो आजकाल अर्थहीन हिंदी सिनेमे, टिव्ही सिरीयल आणि ’अन’रियालीटी शो-स पहाणे पुर्णपणे बंद केलय मी. त्यामुळे विकएंडला तीन चार तास तरी वाचतात. तो वेळ मी माझी बायको आणि माझ्या दोन मुली ह्यांच्याबरोबर घालवतो. मग ते दमून झोपायला गेले की आपल्या संत रामदासांची आठवण येते. ते म्हणुन गेले होते ना की... दिसामाजी काही तरी ते लिहावे.... (पण म्हणून अगदी काहितरीच लिहु नये)... ह्या विचाराने लिहीण्यासाठी लेखणी हातात घेतो आणि मग ’महानोर’ करत असत तशी विनवणी करत म्हणतो... "शब्दगंधे, तु मला बाहुत घ्यावे"!

टीकाकार: बापरे आता ही शब्दगंधा कोण? आणि बायको झोपल्यावर ’तिच्या’ बाहूत जाता... मज्जा आहे बुवा ऎका मुलाची ;) मिड लाईफ़ क्रायसीस म्हणायचा की! पण जरा जपुन बरं का चित्रे...

मी: अहो काय वाट्टेल ते काय बोलता? जी शब्द सुचवते ती शब्दगंधा देवी! आता लिहायला घेतल्यावर जर तिने शब्दच सुचवले नाहीत तर मग काय लिहीणार कपाळ? म्हणून तिला विनवतो इतकेच!

टीकाकार: पण काय हो, संमेलन संपल्यानंतर तुमचे मनोगत सांगताय, म्हणजे हे वराती मागून घोडं येण्यासारखचं झाल, नाही का?

मी: अहो कमाल करताय. संमेलनाची तुलना वरातीशी काय करता? संमेलन म्हणजे काही तीन दिवसाचा लगीनसोहळा नव्हे, की एकदा वरहाडी मंडळी निघुन गेली की संपली जबाबदारी! अहो, विश्व संमेलन ही एक प्रथा आहे. जगभर पसरलेल्या मराठी साहित्यीकांचा गौरव करण्याची! ती टिकायला हवी. त्या द्रुष्टीकोनातुन मनात दडलेले विचार लिहीले इतकच! कोणी सांगाव, कदाचित माझ्या ह्या विचारांचा भावी संयोजकांना ऊपयोग होईल!

टीकाकार: पण तुमचे हे "सो काँल्ड" विचार म्हणजे तुमच्या विरोधकांना उत्तर देण्याचा एक ’केविलवाणा’ प्रयत्न वाटतो हो. असे करु नये, चित्रे. अहो लोकांच्या भावना दुखावतात अशांने.

मी: खरचं? तसं वाटल तुम्हाला? पण तसा अजिबात हेतु नाही माझा. अहो एव्हढा लांबलचक लेख लिहीण्यामागचा उद्देश हाच की सर्वांना हे सांगावे की, संमेलनात भाग घेण्यामागे काही ठोस विचार होते. ऊगाच घ्यायचा म्हणून मी भाग घेतला नाही. केवळ नडायचे म्हणून नडलो नाही. घरातील कामे, आँफ़ीसची कामे, मुलींचे अभ्यास ही सर्व तारेवरची कसरत सांभाळताना अहो नाके ’अठरा’ येतात - नऊ कसले? पण तरीदेखिल संमेलनाच्या भानगडीत ’पडलो’ ते मराठी साहित्यीकांचा गौरव करण्यासाठी, ह्याचा विचार विरोधक करतील आणि पुढील संमेलनात सहभागी होतील अशी आशा वाटते.

आता भावनांचे म्हणालं तर शेवटी मराठी माणसांच्या भावना त्या! त्यांना दुखायला फ़ारशी कारणं आणि वेळ लागत नाही हो. पण मी जेव्हा लिहीतो ना तेव्हा कोणाच्याही भावना दुखवण्याचा कधीच हेतु नसतो माझा. तरी देखील कोणाच्या भावना दुखावल्याच तर आधीच माफ़ी मागतो.

माझे लेखन म्हणजे स्वत:च्या करमणुकीकरता केलेली खरडपट्टी आहे ह्याची नोंद वाचक घेतील अशी अपेक्षा आहे. वाचकांना माझी मते आवडली तर आनंद आहे, पण नाही आवडली तर बिनधास्त मला कळवून ते माझी कानऊघडनी करतील अशी अपेक्षा आहे. शिवाय माझी कानऊघडणी करणे सोपे जावे ह्याकरता माझ्या ब्लाँगच्या सेटिंगस मी बदललेल्या आहेत. ह्या पुढे comments लिहायला Id किंवा Profile ची गरज नाही. कोणीही यावे आणि Anonymous राहून मला मनसोक्त शिव्या द्याव्यात!

टीकाकार: पण काय हो, आपल्याच घरचं कार्य आपण स्वत:च "यशस्वी झाले" असे घोषीत करणे हे बरे दिसते का?

मी: नाही हो, पण हे मत माझे नाही. हे मत आमच्या पाहुण्यांचे आहे. वाचा ह्या दुव्यावर...
http://onlinenews.lokmat.com/php/detailedmanthan.php?id=Manthan-52-1-21-02-2009-d5f58&ndate=2009-02-22

टीकाकार: पण नाही म्हणायला थोड्याफ़ार तरी चुका झाल्या असतीलच ना? मग त्याबद्दल लिहा की. त्याचा खरा ऊपयोग होईल पुढच्या संमेलनाला!

मी: लिहीन की. चुका तुम्ही माझ्या नजरेत आणून द्या, मग लिहीतो.

टीकाकार: पण मला सांगा, ह्या संमेलनाने नक्की काय साधले हो?

मी: बरेच काही. पण ह्या प्रश्नाचे ऊत्तर द्यायचे तर एक वेगळाच लेख लिहावा लागेल. लिहू पुढे केव्हांतरी. मग काय म्हणता? टाकू का माझा लेख माझ्या ब्लोगवर?

टीकाकार: तशा शुध्दलेखनाच्या बरयाच चुका आहेत, तरी टाका... पण हे बघा.. डोन्ट क्वीट युवर डे टाईम जाँब हं... म्हणजे... अंटील युवर जाँब क्वीट्स यु ;)

Wednesday, March 11, 2009

पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन - माझे मनोगत

नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्यसंमेलनात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी माझ्या सुदैवाने मला प्राप्त झाली.  संमेलनापुर्वि आणी आता संमेलनानंतरही बरयाच जणांनी मला विचारले की नक्की कशासाठी केला होतात तुम्ही हा अट्टाहास?  तर ह्या मुद्दाबद्द्लची माझी वैयक्त्यीक मते मी ह्या लेखात  मांडत आहे.

खर तरं "साहित्य" हा शब्द ऎकला की माझ्या बरयाच मित्रमंड्ळींच्या छातीत धडकी भरते.  रात्री झोप येत नसेल तर ती पटकन यावी याकरता साहित्य उपयोगी पड्ते असा ऎक सर्वसाधारण समज आहे (आणी काही काही साहित्या बाबत तो समज अगदीच काही गैर नाही!). पण मला असे वाटते की, उक्रुष्ट साहित्यावीना कुठलीही कलाक्रुति यशस्वी होऊच शकत नाही, मग कलाकार कितीही मोठा का असेना! चांगल्या कथेविना सिनेमा किंवा नाटक लोकांना आवडेल का? पण असे असुन देखील साहित्यीकांना मात्र फ़ारसे कोणी नावाजत नाही ही मला नेहमी वाटत आलेली खंत आहे.  आता अलीकड्चेच उदाहरण घ्या ना! "स्लमडाँग मिलीयाँनर" ह्या चित्रपटला ८ आँस्कर ची बक्षीसे मिळाली, पण ज्या पुस्तकावर हा चित्रपट आधारीत आहे त्या पुस्तकाचे लेखक "विकास स्वरुप" ह्यांचा मात्र कोणीच गौरव करत नाही ह्याचे खुप आश्चर्य वाट्ते.  गेल्या वर्षी हाँलीवुड मधील सर्व लेखक मंड्ळी संपावर गेली तेव्हा टीव्ही वाल्यांची जी काही त्रेधातिरपीट उडाली होती ती आपण सर्व जाणतोच.  गेल्या वर्षीचा आँस्करचा कार्यक्रम सपशेल पडला असे म्ह्टले तर अतिशयोक्ती होणार नाही.  एकंदरीत साहित्यीक हा नेहमीच उपेक्षीला जातो असा माझा अनुभव आहे.  त्यामुळे जेव्हा आमच्या मंड्ळाने साहित्यसंमेलन करण्याचे ठरवले तेव्हा त्यांना मदत करणे हे आपले कर्त्यव आहे असे मला वाट्ले.  आता चांगले लेखन किंवा काव्य  करुन "साहित्यसेवा" करण्याची नाही लायकी आमची, पण निदान "साहित्यीक सेवा" तरी करावी असे वाटले एतकेच!

काहीं जणांनी असे ही म्हटले की ह्या साहित्यसंमेलनात साहित्यापेक्षा मनोरंजनावर जास्त भर देण्यात आला आहे.  हे वाचुन तर मनात थोडे हसुच आले. मनोरंजनाचा आणी साहित्याचा काहीच संबंध नाही का हो?  मनोरंजक कार्यक्रम हे शेवटी साहित्यावरच आधारलेले असतात ना?  मग मनोरंजन झाले तर ते साहित्य नव्हे, कारण साहित्यावर आधारलेले कार्यक्रम हे नेहमी रटाळच व्हायला हवेत, ह्या विचारसरणीमुळेच कदाचीत सामान्य मराठी माणुस साहित्य संमेलनांपासुन घाबरुन दुर पळत असावा.  त्या मराठी माणसाला जर साहित्यसंमेलनाकडे आकर्षित करायचे असेल तर ही संकुचीत विचारसरणी आपल्याला बदलायला हवी. पुलंचे साहित्य हे जितके मनोरंजक आहे तितकेच साहित्यीक द्रुष्टीकोनातुन मौल्यवान आहे.  सलीलने गायलेल्या संदीपच्या गाण्यांबाबतही हेच म्हणता येईल.  खरे तर, संमेलनात साहित्य सादर करताना ते मनोरंजनात्मक पध्द्तीने सादर करणे हे आव्हान साहित्यीकांनी स्विकारायला हवे, आणि ते आव्हान त्यांनी जर का स्विकारले नाही तर जगभर पसरलेला मराठी समाज हा साहित्यसंमेलनांपासुन दुरच राहील.  ह्या ठिकाणी एक खास उदाहरण द्यावेसे वाटते.  विश्व संमेलनाच्या शेवटच्या दिवशी "संत वांड्म्य आणी आधुनिक विद्यान" नावाचा एक परिसंवाद होता. विषयाचे नावच इतके भारदस्त की माझ्यासारख्या सामान्यांना नाव ऎकताच डुलकी यावी!  पण ह्या परिसंवादात श्री. मिलींद जोशी ह्यांनी, त्यांना देण्यात आलेल्या थोड्या वेळात, विनोदाच्या आधारे आपले विचार अगदी सुरेखपणे मांडुन रसिकांची मने जिंकली.  अशाप्रकारे जर मनोरंजक पध्द्तीने साहित्य लोकांसमोर मांडले तर मग प्रेक्षकांना साहित्य कंटाळवाणे वाटणार नाही, आणी मग लवकरच प्रेक्षकांचे रुपांतर श्रोत्यांत होईल.  

एकंदरीत पहाता पहिले विश्व मराठी संमेलन यशस्वी झाले असे म्हणायला हरकत नाही.  संमेलनाची तयारी करताना "कधी गहीवरलो, कधी धुसपुसलो", पण जी काय मेहेनत घेतली तीचे चीज झाल्याचे समाधान वाटले.  भारतातुन आलेल्या काही ओळखीच्या तर अनेक अनोळ्खी साहित्यप्रेमींची सेवा करण्याची मला संधी मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला.  ह्यापुढेही विश्व मराठी साहित्य संमेलन दर दोन वर्षांनी करण्याची ही नविन प्रथा चालू ठेवण्यास जगाच्या पाठीवर कोणीतरी, कुठेतरी पुढाकार घेईल अशी आशा वाटते, आणी जर का कोणी नाहीच पुढाकार घेतला तर आमचे बे एरिया महाराष्ट्र मंड्ळ परत कंबर कसेल अशी खात्री वाट्ते.

अजय चित्रे
फ़्रीमाँट, कँलीफ़ोरनीया